दिवाळी निबंध मराठी | दिवाळी सणाची माहिती | Diwali Nibandh
दिवाळी- हा भारतातील सणांचा राजा.
दिवाळी हा भारतातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या सणांपैकी एक आहे. हिंदू धर्मातील लोक सण पाच दिवस साजरा केला जातो, आणि या सणाचा प्रमुख दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन असतो. दिवाळी सणाला ‘प्रकाशाचा सण’ म्हणूनही ओळखले जाते कारण या दिवशी घर, अंगण, गल्ल्या दिव्यांनी उजळून निघतात. घरासमोर विविध रांगोळ्या काढतात. या उत्सवाला आनंद, एकता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणात वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज असे अनेक सण साजरे केले जातात. या प्रत्येक दिवसाचे एक वेगळा धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.
वसुबारसला गायींची पूजा केली जाते, तर धनत्रयोदशीला धनाची पूजा करणे आणि लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळवणे अत्यंत शुभ मानले जाते.
दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्व घरामध्ये स्वच्छता केली जाते, रंगबिरंगी रांगोळ्या काढल्या जातात, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण नवीन कपडे घालतात. या सणात गोडधोड पदार्थांचीही खूपच रेलचेल असते. यामध्ये लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळी इत्यादी पारंपरिक पदार्थ बनविले जातात.
दिवाळीच्या दिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते. या वेळी धनाची देवी लक्ष्मी आणि बुद्धीचा देवता गणपती यांची विधिपूर्वक पूजा केली जाते. हे पूजन म्हणजे धन, ऐश्वर्य, सुख-समृद्धी आणि शांततेचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मीपूजनाच्या रात्री सर्व घरांना आणि मंदिरांना दिव्यांनी सजविले जाते. दिव्यांचा प्रकाश हा अज्ञानाच्या अंधःकारावर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे.
दिवाळी सणाच्या आधीपासूनच बाजारात खरेदीला विशेष महत्त्व असते. लोक या काळात नवीन कपडे, दागिने, फटाके आणि विविध वस्तू खरेदी करतात. विशेषत: दिवाळीच्या काळात सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. बाजारपेठांमध्ये आणि दुकानांमध्ये गर्दी वाढते, आणि या काळात एक उत्साहजनक वातावरण तयार होते.
लहान मुलांसाठी फटाके फोडणे हा सर्वात आवडता भाग असतो. परंतु, सध्या पर्यावरणाच्या संदर्भात विचार करून, कमी फटाके फोडण्याची आणि प्रदूषण कमी करण्याची गरज आहे. दिवाळीच्या काळात ध्वनी आणि वायू प्रदूषणाची समस्या वाढते, म्हणूनच फटाक्यांचा वापर मर्यादित ठेवावा अशी जनजागृती केली जाते.
दिवाळी हा फक्त धार्मिक सण नसून, तो एकता, समृद्धी आणि सामाजिक बंधुतेचे प्रतीक आहे. या सणाच्या निमित्ताने सर्व कुटुंब, मित्रमंडळी एकत्र येऊन आनंद साजरा करतात. समाजातील दारिद्र्य, अंधार आणि दुःख यांना दूर करून एक नवीन आशेचा, आनंदाचा आणि समृद्धीचा प्रकाश पसरविण्याचा हा संदेश या सणातून दिला जातो.
दिवाळी सणाच्या काळात अनेक जण गरजू व्यक्तींना मदत करतात, गरीब मुलांना कपडे, अन्न वगैरे देतात, यामुळे दिवाळीचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित होतो. दिवाळीचा उत्सव साजरा करताना, आपल्या आनंदात इतरांनाही सामील करून घेणे, आणि पर्यावरणाच्या संरक्षणाची काळजी घेणे, हीच खरी दिवाळीची परंपरा आणि संदेश आहे.
Happy Diwali !